सोलापूर शहर हे दक्षिणी महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते सोलापूर जिल्हयाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर सोलापूर चादरी प्रसिध्द आहेत. सोलापूराचे प्राचीन रहिवासी श्री सिध्दरामेश्वर यांनी या सोलापूरात 68 शिवलिंगांची तसेच अष्टविनायकांची स्थापना केली. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. सोलापूर हे भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्व प्राप्त झाले आहे.
सोलापूर शहराला “हुतात्मांचे शहर” म्हणून देखील ओळखले जाते. 4 मे 1930 ला महात्मा गांधीजींना अटक करण्यात आल्यानंतर सोलापूर शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आणि 1930 च्या सत्याग्रह आंदोलनात
संपूर्ण देशात फक्त सोलापूरला लष्करी कायदा जारी करावा लागला अशी कबुली भारत मंत्री बेजबुड बेन यांनी ब्रिटीश संसदेत दिली. पोलीसांच्या खुनाला जबाबदार असल्याच्या आक्षेपावरुन मल्लप्पा धनशेटटी,कुर्बान हुसेन,जगन्नाथ शिंदे, आणि श्रीकिशन सारडा यांना पकडण्यात आले आणि 12 जानेवारी 1931 रोजी येरवडयाच्या तुरुंगात फाशी देयात आले. हा दिवस सोलापूर मध्ये “हुतात्मा दिन” म्हणून पाळला जातो.
|